पुणे ::
Indapur, Pune येथील उद्योजक अर्जुन देसाई यांच्या नेचर डिलाइट उद्योगसमूहावर आयकर विभागाने बुधवारी (ता. 05) सकाळी छापा मारला. तर त्यांचे जावई जय हिंद कॅटल फीडचे व्यवस्थापकीय संचालक मयूर कांतीलाल जामदार यांच्या निवासस्थानावरही आयकर विभागाचे पथक पोहोचले होते.
आयकर विभागाने अर्जुन देसाई यांच्या कळस येथील नेचर डिलाईट उद्योग समूह, त्यांच्या इतर कंपन्या आणि त्यांचे जावई मयूर कांतीलाल जामदार यांच्या बेलवाडी येथील पवार मळा या निवासस्थानी छापे टाकले. तसेच, देसाई यांचे नातेवाईक संतोष कदम यांच्या माळशिरस (जि. सोलापूर) येथील निवासस्थानी देखील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असल्याची माहिती आहे.
अर्जुन देसाई हे मोठे उद्योजक असून, बांधकाम व्यावसायिक देखील आहेत. नेचर डिलाइट उद्योगसमूहाबरोबर देसाई इन्फ्रा नावाची कंपनीदेखील आहे. देसाई उद्योगसमूहाचे दुग्ध प्रकल्प, पशुखाद्य उत्पादन, पाणी प्रकल्प याठिकाणी कार्यरत आहे. सुमारे 20 लाख लिटर दैनंदिन क्षमता असलेला मोठा दूध प्रकल्प या ठिकाणी गेली 8 वर्षे कार्यरत आहे.